| पाताळगंगा | प्रतिनिधी |
‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा…’ हे गाणे गुणगुणायला थंडी सुरू झाली आहे. या काळात आजी-आजोबांसह बच्चेकंपनीला शेकोटीची अन् मायेची ऊब अनुभवायची मजा काही वेगळीच. मात्र, काळाच्या ओघात ग्रामीण भागातून शेकोटी संस्कृती हद्दपार झालेली दिसत आहे. मुलांनी शेकोटी पेटवणे, हा उपद्व्याप ठरत असून जखमी होण्याचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे शेकोटी ही संस्कृती कालबाह्य होत आहे. पूर्वी थंडीचा बचाव करण्यासाठी मुबलक प्रमाणात उबदार कपडे मिळत नसल्याने शिवाय जंगलात लाकूड मोठ्या प्रमाणात मिळत असे. परंतू काळाच्या ओघात जंगले नामशेष होत चालली आहे.
अंगावर परिधान करण्यासाठी गरम कपडे आल्याने या शेकोटीकडे तरुण वर्ग पाठ फिरवित आहे. हीच खरी वस्तुस्थिती आहे. मात्र सकाळ-संध्याकाळी गारव्यासह धूसर धुक्याची चादर दृष्टीस पडत आहे. थंडी पडू लागली की, ग्रामीण भागात थंडीच्या दिवसांत ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसायच्या आजी-आजोबा आणि वडीलधाऱ्यांसोबत शेकोटीभोवती बसून लहान मुले शेकोटीची अन् मायेची ऊब अनुभवत असत. या वेळी गप्पागोष्टी, गाणी, ओव्या, अभंग, रुढी, परंपरा, वडीलधाऱ्यांचे जीवनानुभव इ. संस्कार शिदोरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने संक्रमित व्हायची. काही वर्षांपासून ग्रामीण भागात आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. जीवनपद्धतीत बदल, संयुक्त कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास आणि अमाप वृक्षतोड इ. घटकांमुळे शेकोटी संस्कृती हद्दपार झाली आहे.







