| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या ठिकाणी असलेल्या टाटा कंपनीच्या मालकीच्या 200 एकर जमिनीवर मोठा खड्डा खोदून त्यात पाणी अडकले जाणार आहे. दरम्यान, या ठिकाणी खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात आहेत. त्यामुळे तापकीर वाडी आणि धनगरवाडा येथील घरांना तडे जात असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 18 डिसेंबरपासून उपोषण केले जाणार आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घार यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण ग्रामस्थ करणार आहेत.
टाटा कंपनीकडून भिवपुरी येथे जलविद्युत प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पासाठी कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर खोदकाम करून पाणी साठवले जाणार आहे. त्या खोदकामासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून स्फोट केले जात आहेत. परिणामी संबंधित डोंगराच्या बाजूला आलेल्या तापकीर वाडी आणि धनगरवाडा ग्रामस्थांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत. तसेच, संपूर्ण परिसरातील बोअरवेलचे पाणी देखील गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या खोदकामामुळे नाल्याला दुषित पाणी येत असल्याने अनेक साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. यासह प्रकल्प परिसरातील झाडे तोडल्यामुळे येथील माकडे गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे घरांचे मोठे नुकसान करतात. त्याची पाहणी करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे. मात्र, कंपनी प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.







