मा.आ. बाळाराम पाटील यांचे आरोप; मविआतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजप आणि प्रशासन अधिकारी यांच्या एकमताने पनवेल महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, जे रस्ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बनवले गेले ते रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. आता त्याच रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरण न करता फक्त खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे. तसेच ठेकेदार शासनाचा निधी वापरत असतानाही स्वखर्चाने काम करीत असल्याचे भासवत आहे, असे मत शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे. पनवेल येथील काँग्रेस भवनात शुक्रवारी (दि.12) महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण याबाबत पत्रकार परिषदेत आघाडीतील नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण घरत, शेकाप विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनसे प्रवक्ते तथा पनवेल महानगराध्यक्ष योगेश चिले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, माजी नगरसेविका लीना गरड यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचा वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणीटंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील गंभीर प्रदूषण यांसह अनेक तातडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच, महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अवास्तव आणि बस थांब्यांबाबतही महाविकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मंगळवारी (दि.16) पनवेलमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. हा मोर्चा सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वळसा घालून पनवेल महानगरपालिकेवर येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, या मोर्चात महाविकास आघाडीतील राज्यपातळीवरील प्रमुख नेतेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.







