रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नाडसुर ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसे, पोटलज खुर्द आणि महागाव परिसरात ग्रामस्थ, शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक आणि तालुका कृषी विभागाच्या संयुक्त पुढाकारातून श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धोंडसे गावात रविवारी (दि.14) उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सर्जेराव पाटील, डॉ. अनिल झेंडे, लीनताज उके, सहाय्यक कृषी अधिकारी कंठाळे, गलांडे, बोराडे, शेतकरी अविनाश खंडागळे आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. दगड, माती, रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या यांचा वापर करून अत्यल्प खर्चात बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील गाई, गुरे, मोकाट जनावरे आणि पक्ष्यांना पाण्याचा आधार मिळणार असून, शेतकऱ्यांना भाजीपाला व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी 12 डिसेंबर रोजी पोटलज खुर्द येथेही ग्रामस्थांच्या लोकसहभागातून अशाच स्वरूपाचा वनराई बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेल्स यांची पातळी वाढण्यास मदत होणार असून, जमिनीतील ओलावा टिकून राहील. विशेषतः वाल, मुग, मटकी यांसारख्या कडधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी पोटलज खुर्द येथील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने श्रमदानात सहभाग घेतला. कृषी सेवक बोराडे एस.बी. हेही उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या एकजुटीचे आदर्श उदाहरण
महागाव व इतर गावांमध्येही शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन श्रमदानातून वनराई बंधारे उभारत आहेत. या उपक्रमामुळे जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत शेतीसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण होत आहे. तर ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि स्वयंस्फूर्तीचा आदर्श उदाहरण म्हणून या उपक्रमांकडे पाहिले जात आहे.







