आंदोलनकर्त्यांची धरपकड
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 15 नोव्हेंबर) रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीने कडसुरे येथे जनआंदोलन छेडण्यात आले.सायंकाळ पर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले, यावेळी पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांची धरपकड करण्यात आली.
या आंदोलनात शिहू चोळे नागोठणे विभागातील प्रकल्पग्रस्त, वंचित बहुजन आघाडीचे रायगड सह राज्यातील नेते, पदाधिकारी यांनी रिलायन्स विरोधात एल्गार पुकारला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, याप्रसंगी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना कडसुरे मटेरियल गेट कडे जाऊ दिले नाही, त्यामुळे कडसुरे प्रवेशद्वारानजीक आंदोलकांनी ठिया मांडला, यावेळी प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्वतेज साळवी, अनिल वाकोडे, लक्ष्मण भालेराव, सिद्धार्थ दाभाडे,सिद्धार्थ सोनावणे, सखाराम सकपाळ, सागर भालेराव राय महेश येलवे, लक्ष्मण जाधव,देवीदास जाधव दीपक गायकवाड किशोर मोरे,उत्तम शिंदे, किरण मोरे, संजय. गायकवाड, नितीन गायकवाड आदींसह पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाच्या वतीने रोहा तहसीलदार कविता जाधव, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे,पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी , पेण पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक 7, सहायक पोलिस निरीक्षक 14, पोलीस कर्मचारी 150 आदी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.