| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जवळील कोतवाल वाडी येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचा 83 वा बलिदान दिन मराठी महिना तिथीप्रमाणे क्रांतीज्योती पेटवून साजरा झाला. भल्या पहाटे सहा वाजून दहा मिनिटांनी दोन्ही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी देशप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केली तसेच क्रांतिकारकांचे स्मरण करणारी भाषणे केली. राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी सुभाष दगडखैर यांचे हस्ते क्रांतीज्योती प्रज्वलित करण्यात आली. त्याचेवेळी अवसरे येथे स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर स्मारक येथे क्रांतीज्योती प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
माथेरान येथील क्रांतिकारक भाई कोतवाल आणि मानिवली येथील क्रांतिकारक हिराजी गोमाजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी सकाळी सहा वाजून 10 मिनिटांनी ब्रिटिशांच्या गोळ्यांनी हौतात्म्य प्राप्त झाले. या दोन्ही क्रांतिकारक यांना देशासाठी लढताना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुताम्य 2 जानेवारी 1943 झाले होते. तर मराठी महिना नुसार मार्गशीष वद्य एकादशी हा दिवस असल्याने या दिवशी नेरळ जवळील कोतवाल वाडी येथे स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी उभारलेल्या कोतवालवाडी ट्रस्टमध्ये तिथीप्रमाणे या दोन्ही हुतात्म्यांचा बलिदान दिन साजरा केला जातो.
सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी सुभाष दगडखैर यांचे हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यावेळी कोतवाल वाडी ट्रस्टचे अध्यक्षा संध्या देवस्थळे, माजी अध्यक्ष अनसूया पादीर, तसेच विश्वस्त रामचंद्र ब्रह्मांडे, सावळाराम जाधव, शेखर भडसावळे, बाळकृष्ण पादीर उपस्थित होते. तसेच विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनाचा आढावा घेणारे भाषणे केली. यावेळी नेरळ ग्रामपंचायत माजी उप सरपंच बल्लाळ जोशी,माजी सदस्य राजन लोभी, नेरळ विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका विनया काकडे, यांच्यासह अनेक देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा स्मुती दिन अवसरे येथील स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर स्मारक येथे देखील तिथीप्रमाणे सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी क्रांतीज्योत पेटवून साजरा झाला.







