| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने एकोणीस वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर खेळवली जात आहे. या दोन दिवसीय कसोटी प्रकारात प्रत्येक संघाला दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळत असते. असाच एक सामना गव्हाण येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील मैदानावर बीड जिल्हा क्रिकेट असो. विरुद्ध सातारा जिल्हा क्रिकेट असो. या संघांमध्ये रंगला होता. या अटीतटीच्या सामन्यात साताऱ्याने विजय मिळवला.
सातारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज करताना पहिल्या डावात सर्व गडी बाद 201 धावा केल्या. त्यानंतर बीड संघाने पहिल्या डावात सर्व गडी बाद 221 धावा केल्या. मात्र, पहिल्या डावात बीड संघाने 20 धावांची आघाडी घेऊन देखील दुसऱ्या डावात साताऱ्याच्या भेदक गोलंदाजी समोर अवघ्या 24 धावांनी सामना गमवावा लागला. सातारा संघाने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 106 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात बीड संघाला सामना जिंकण्यासाठी 87 धावांची गरज असताना दुसऱ्या डावात संघाचा अवघ्या 62 धावसंखेवर डाव आटोपला. त्यामुळे सातारा संघाने हा सामना 24 धावांनी जिंकला.
सामन्यासाठी प्रमुख अतिथि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू, सुजित ठाकूर, सुदेश ठाकूर, रोशन ठाकूर व आरडीसीए उपाध्यक्ष राजेश पाटील आदी उपस्थित होते. तर, सामनाधिकारी म्हणून चंद्रकांत म्हात्रे, ॲड. पंकज पंडित व सनी म्हात्रे यांनी काम पाहिले. सातारा संघाचे प्रशिक्षक हेमंत गुजर यांनी विजयाचे सर्व श्रेय आपल्या खेळाडूंनी मैदानावर घेतलेल्या मेहनतीला दिले आहे. आपल्या संघातील सर्व गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत हरलेला सामना जिंकून दाखवल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले.







