। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील एका नामांकित वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी 90 वर्षांच्या वृद्धेला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. ही घटना एका वृद्धाश्रमात घडली. महिलेच्या भाचीने यासंदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनेची शहानिशा करून दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
या आश्रमात राजू व अनिल हे दोन कर्मचारी काम करतात. या दोन कर्मचाऱ्यांनी या वृद्धेला मारहाण केली. या महिलेने तिच्या भाचीकडे आश्रमातील वागणुकीची तक्रार केली होती. याची माहिती त्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या रागातून त्यांनी काठीने आणि बुक्क्याने वृद्धेला मारहाण केली. तसेच तिला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या जखमी वृद्धेला कांदिवली येथील रूगणालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सहाय्यक पो. नि. गौरव इंगोले यांना दिले.







