| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना शिक्षणासोबतच संस्कार, कला व क्रीडा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण असल्याचे नमूद केले. दि. 10 ते 17 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, चित्रकला, हस्तकला, रंगावली स्पर्धेबरोबरच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, समूह नृत्य, एकांकिका, नाट्यछटा, देशभक्तीपर गीत, लोकनृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादर केलेल्या रंगतदार मेजवानीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. याप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्नेहसंमेलनास संस्थेचे विश्वस्त सदस्य महंमद मेमन, खजिनदार बाळकृष्ण उर्फ उदय बापट, संचालक गणेश पाटील, मंदार तोडणकर, श्रीकांत तोडणकर, निशांत मोरे, रत्नाकर पाटील, अनंत भायदे, रमेश घरत, कुमार गाणेकर, प्रकाश जैन, मुख्याध्यापक बाळासाहेब यळमंते, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







