| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून अक्षया नाईक निवडून आल्या आहेत. त्यामुळे अलिबागची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आज सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील या सासू-सुनेचा वाढदिवस नसून, मायलेकीचा वाढदिवस साजरा होत आहे. सुप्रिया पाटील यांनी सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. शैक्षणिक, पत्रकारिता या क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अलिबाग अर्बन बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम त्यांनी अध्यक्ष म्हणून सक्षमपणे केले आहे. चित्रलेखा पाटील अर्थात चिऊताई यांनी अगदी कमी कालावधीत राजकीय वलय निर्माण केले. त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात त्यांचे प्रभावी काम आहे, असे गौरवोद्गार शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी काढले.







