। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
इलेक्ट्रिक स्कुटीला सिमेंट बलकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोलघर येथील विद्या विठ्ठल गायकर (51), यांचा मृत्यू झाला. या अपघाता प्रकरणी सोमवारी (दि. 22) पनवेल शहर पोलीस ठाण्यात बलकर वरील चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल बजरंग गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटी घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालय येथे गेले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास पळस्पेकडून पेण कडे जाणाऱ्या गोवा हायवेने जात असताना क्षणभर विश्रांती हॉटेल समोरील पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येऊन बलकर वरील चालकाने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटीला धडक दिली. या अपघातात विठ्ठल गायकर आणि विद्या गायकर हे जखमी झाले. विद्या गायकर यांना रुग्णवाहिकेने पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.







