जिल्हा परिषदेसाठी अलिबागचा दिला उमेदवार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कल्पना पाटील यांचा जिव्हारी पराभव झाला असून, या निकालामुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच स्थानिक पातळीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मंगळवारी (दि.23) आमदारांनी मुरुडमधील काही स्थानिक नेत्यांना उघडपणे लाखोल्या वहिल्या. तसेच जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून नोकर देतोय, असे सांगत तो पडला तर याद राखा, अशा धमकीवजा वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली होती. या वक्तव्यामुळे मुरुडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुरुडमध्ये शिंदे गटाचे अनेक दिग्गज आणि निष्ठावंत कार्यकर्ते असताना अलिबागच्या उमेदवाराला मुरुडमध्ये उभं करणार असल्याच्या आमदारांच्या निर्णयामुळे मुरुडकरांवर आमदारांचा विश्वास राहिला नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूकीत प्रचारादरम्यान दमदाटी, आर्थिक देवाणघेवाण आणि राजकीय दबाव याचे आरोप सातत्याने ऐकू येत होते. विरोधकांकडून हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला होता. त्याचा परिणाम थेट मतदानावर झाला असून, शिवसेनेच्या उमेदवार कल्पना पाटील यांना पराभव पत्करावा लागल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या पराभवामुळे मुरुडमधील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात पक्षांतर्गत आत्मपरीक्षण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, विरोधी गटाने हा निकाल दबावाच्या राजकारणाला मतदारांनी दिलेला नकार असल्याचा दावा केला आहे.
निवडणूक काळात दिलेल्या धमकी, आरोप आणि आर्थिक व्यवहारांच्या चर्चेमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आता निकालानंतर या सर्व बाबींची चौकशी होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुरुड बाहेरचा उमेदवार मुरुडकरांवर लादण्यात येणार असून आमदाराच्या दबावाखाली त्याचे काम निमूटपणे करण्याची नामुष्की मुरुडमधील इच्छूक उमेदवारांवर आली आहे.







