तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्याकडून आंदोलनाचा इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चांगले व सुसज्ज रस्ते देण्याच्या बतावणी करीत शासनाकडून करोडो रुपयांची उधळण केली जात आहे. कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. हा रस्ता धुळीच्या साम्राज्यात अडकला आहे. एमएसआयडीसी अंतर्गत होणाऱ्या कामाबाबत शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. चांगल्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली जाणार आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला आहे.
अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहे. खड्डे खोदून ठेवले आहेत. काही कामे अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेेखिंड हा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. अवजड वाहनांसह वेगवेगळी वाहने याच रस्त्यावरून धावतात. मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. स्थानिकांना विश्वासात न घेता काम करण्यात आले. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे काम झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे हा रस्ता धुळीच्या साम्राज्यात अडकला आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. या रस्त्यावरून धुळीचे लोट वाढल्याने श्वसनाचे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबांवर होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा व श्वसनाचे आजार असणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण स्थितीत असलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी संताप व्यक्त केला आहे. या अपूर्ण कामाबाबत विद्यमान आमदारांनी लक्ष देणे गरजेचे असताना त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या मार्गावरील प्रवाशांसह तेथील स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे. अधिकारीदेखील याबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. या गंभीर समस्येबाबत आमदार, अधिकारी यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जाताना दिसत नाही. नागरिकांनी वारंवार तोंडी तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश घरत यांनी व्यक्त करीत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली जाणार असल्याचे श्री. घरत यांनी सांगितले.







