मद्यपी चालकावर दंडात्मक कारवाई
| माणगाव | प्रतिनिधी |
नव वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला माणगाव शहरात वाढत्या वाहतूक अराजकतेला आळा घालण्यासाठी माणगाव पोलीस व वाहतूक पोलीस विभागाने संयुक्तपणे कडक नाकाबंदी राबवली. थर्टी फर्स्टच्या दिवशी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, महामार्ग, एसटी बस स्थानक, महाविद्यालय परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी अचानक उभारण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली.
वाहन चालकांची चांगलीच झाडाझडती घेत, नववर्षाच्या पूर्वसंख्येला म्हणजे थर्टीफर्स्ट दिवशी माणगावात नाकाबंदी केली. या कारवाईत मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या अनेक वाहनचालकांचे धाबे दणाणले. त्यामुळे अवैद्य वाहतूकदारांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. यामुळे संयुक्त पोलिसांच्या कारवाईत वाहन चालकांना चांगलाच शिस्तीचा दणका मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून माणगाव शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. हेल्मेटविना दुचाकीस्वार, सीटबेल्ट न लावणारे चालक, अपूर्ण कागदपत्रे, प्रदूषण प्रमाणपत्र नसलेली वाहने, अवैध व तुटलेल्या नंबर प्लेट्स, काळ्या काचा असलेली वाहने, परवाना नसलेले चालक, ट्रिपल सीट दुचाकीस्वार, बुलेटच्या कर्कश सायलेंसरचा त्रास, सायरन लावलेली वाहने यामुळे अपघातांची शक्यता वाढत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत विशेष तपासणी मोहीम सुरू केली. या नाकाबंदी दरम्यान सकाळी व सायंकाळी शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, अनेक वाहनधारकांवर कागदपत्रांच्या अभावामुळे दंड ठोठावण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही मोहीम रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशाने तसेच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भुजबळ यांच्या नियोजनाखाली पोलीस व वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड, एएसआय पाटील तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे ही नाकाबंदी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, शहरात वाहतूक शिस्त पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी बहुतांश नागरिकांनी पोलिसांच्या धडक कारवाईचे स्वागत करत, अशा मोहिमांमुळे शहरात नियमबद्ध वाहतूक आणि सुरक्षितता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या तपासणी मोहिमेत वाहतूक पोलीस शिवराज बांडे, शेरकर, यांनी सक्रिय सहभाग घेतला. कडक नाकाबंदीमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, माणगाव शहरात वाहतूक शिस्तीच्या दिशेने पोलिसांचे हे पाऊल निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कायद्याचे पालन करा
नागरिकांनी वाहनांचे सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्य करावा आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






