| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल मनपा हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांसाठी महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पुर्णत: पालन करावे अन्यथा महानगर पालिकेच्यावतीने कठोर कारवाई करणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी नमुद केले आहे. पनवेल मनपा कार्यक्षेत्रात बांधकामांच्या ठिकाणी धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मनपा क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांची महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी आयुक्त बोलत होते.
वायु प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्यावर महापालिका भर देत आहे. हवा प्रदूषण, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था या संदर्भात महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम विकासकांनी योग्य ती काळजी घ्यावी. यासाठीच्या उपाययोजना विहीत काळात केल्या नाही तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना या बैठकित आयुक्तांनी दिल्या आहेत. यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक नगररचनाकार केशव शिंदे, उपायुक्त स्वरूप खारगे, रचना सहाय्यक अनिकेत दुर्गावळे, मुख्य आरेखक नितीन हुद्दार यांच्यासह बांधकाम क्षेत्राशी निगडीत क्रिडाई, एमसीएचआय, बीएनएएम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थितीत होते. याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.





