| नागपूर | प्रतिनिधी |
जगातील जवळपास तीन-चतुर्थांश वाघांचे घर असलेल्या भारतात 2025 मध्ये तब्बल 166 वाघांचा मृत्यू झाला असून, 2024 च्या तुलनेत ही संख्या 40 ने वाढली आहे. 2024 मध्ये 126 मृत्यूंची नोंद झाली होती, अशी माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
मध्यप्रदेशात सर्वाधिक 55 मृत्यूंची नोंद झाली, तर इतर प्रमुख मृत्यू महाराष्ट्र 40, केरळ 13 आणि आसाम 12 वाघांचे मृत्यू नोंदवले गेले. देशभरात मृत्यू झालेल्या एकूण वाघांपैकी 31 बछडे होते. यापैकी बहुतेक मृत्यूंमागे प्रादेशिक संघर्ष हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जागेच्या कमतरतेमुळे होणारी प्रादेशिक भांडणे हे वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. वाघांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अधिवासाची आव्हानेही निर्माण झाली आहेत. वाघाच्या मृत्यूची शेवटची नोंद 28 डिसेंबरला मध्यप्रदेशातील उत्तर सागर येथे आढळलेल्या एका प्रौढ नर वाघाच्या स्वरूपात झाली.






