महिलांसाठी मकर संक्रांतीचे आरोग्यदायी वाण
| रायगड | प्रतिनिधी |
वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या आयुष्यात येणारा रजोनिवृत्तीचा टप्पा अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हाने घेऊन येतो. या संवेदनशील काळात महिलांना योग्य उपचार, समुपदेशन आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक 40 ते 55 वयोगटातील महिलांसाठी मकर संक्रांतीचे आरोग्यदायी वाण ठरले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्या उपस्थितीत या विशेष उपक्रमाचे उद्घाटन झाले. या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना मोफत तपासणी, औषधोपचार तसेच मानसिक समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भोपाळे यांनी रजोनिवृत्तीदरम्यान होणारे हार्मोनल बदल, हाडांचा ठिसूळपणा, उष्णतेचे झटके आणि थकवा यासारख्या त्रासांबाबत सविस्तर माहिती दिली. तर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना सिंग यांनी या काळात महिलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दर बुधवारी हे रजोनिवृत्ती क्लिनिक महिलांच्या सेवेसाठी खुले राहणार असून, जास्तीत जास्त महिलांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







