| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
वाकडी येथील रिसॉर्टमध्ये पार्टी करून घरी परत जात असताना पार्टीमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या रागातून चिपळे ब्रिजजवळ माधव येरोले (35) याला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सुधीर ठोंबरे, जीवन कांबळे, सुभाष घाडगे, विराट पवार (सर्व रा. कळंबोली) यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात 17 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
माधव येरोले हा नावडे कॉलनी येथे राहात असून, 16 जानेवारी रोजी पनवेल पालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना शिंदे गटाचे दहा ते पंधरा कार्यकर्ते वाकडी येथील रिसॉर्टवर गेले होते. रिसॉर्टवर पार्टी चालू असताना रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले. रात्री बाराच्या सुमारास ते चिपळे ब्रिजवळ आले. यावेळी त्यांच्यासमोर दोन वाहने येऊन थांबली आणि सुधीर ठोंबरे, जीवन कांबळे, सुभाष घाडगे व विराट पवार यांनी माधव याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जीवन याने माधव याला हॉकी स्टिकने मारहाण केली, तर सुधीर ठोंबरे याने बेसबॉल स्टिकने डोक्यात पाठीमागे मारले. यावेळी सुधीर याने तुषार जाधव याला शिवीगाळ करून ‘उद्या सकाळी बघून घेतो’, अशी धमकी दिली आणि ते निघून गेले. या मारहाणीत माधव येरोले हा जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.






