। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या चेंबूरनजीक एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कॅटरिंग व्यवसायिकांने आत्महत्या केली असून राजकारणामुळे ही आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. प्रकाश राठोड असं आत्महत्या करणार्या व्यावसायिकाचं नाव आहे. या घटनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका कॅटरिंग व्यवसायिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यवसायिकांने चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामधून खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. या चिठ्ठीमध्ये काही लोकांची नावं लिहिली होती. या नावांमध्ये राजकारण्यांची नावं असल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणा संबंधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.
प्रकाश यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते देवनार, गोवंडी आणि चेंबूर अशा अनेक ठिकाणी जेवण पोहोचवतात. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्याकडून लाखोंच्या ऑर्डर घेतल्या होत्या. परंतु त्याचे पैसे दिले नसल्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत गेला. अनेकदा विनवण्या करूनही टाळाटाळ करत असल्यामुळे प्रकाश पुरते वैतागले होते. अखेर आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.