बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात जनुकीय क्रमनिर्धारण सुरू
| पुणे | प्रतिनिधी |
राज्यात मे महिन्यापासून कोरोना संसर्गामध्ये वाढ सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या कोणत्या उपप्रकारामुळे ही वाढ सुरू असून, याचे गूढ लवकरच उलगडणार आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू झाले असून, या आठवडाअखेरीस निष्कर्ष हाती येण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात संसर्गातील वाढीस कारणीभूत असलेला कोरोना विषाणूचा उपप्रकार स्पष्ट होईल.
कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सुविधा पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात आहे. एनआयव्हीमध्ये देशभरातून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने येतात. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सूचना केली. याबाबत महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख व जनुकीय क्रमनिर्धारण राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महाविद्यालयाला जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठविण्याची सूचना करण्यात आली. पुण्यासह ठाणे, सोलापूर आणि लातूरमधून करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने महाविद्यालयाला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत महाविद्यालयाकडे 100 नमुने आले आहेत. त्यामुळे या नमुन्यांच्या सहाय्याने कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे. या जनुकीय क्रमनिर्धारणाचे निष्कर्ष या आठवड्याच्या अखेरीस हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोरोना विषाणूच्या कोणत्या उपप्रकारामुळे संसर्गात वाढ सुरू आहे हे निष्पन्न होईल, अशी माहिती डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
राज्यात 14 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे राज्यात या वर्षभरात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 13 जण सहव्याधीग्रस्त होते. त्यात कर्करोग, ब्रेनस्ट्रोक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसनविकार, क्षय असे विकार होते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.