| सावंतवाडी | प्रतिनिधी |
देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 3.31 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत खतसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी सुखकर्ता कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषीसेवा केंद्राच्या जवळच्या शेतमांगरात राहुल राजेश जोईल (रा. कुणकेश्वर कातवणेश्वर, ता. देवगड) हे अवैधरित्या रासायनिक आणि सेंद्रिय खताचा साठा व विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चौकशी केली असता, जोईल यांच्याकडे खत विक्रीसाठी आवश्यक असलेला परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, देवगड पोलिसांच्या मदतीने संबंधित शेतमांगराची तपासणी करण्यात आली.
यावेळी एकूण 3,31,200 रुपये किंमतीचा अवैध खतसाठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सिंधुदुर्ग यांनी स्थानिक पंच, पोलीस उपनिरीक्षक (देवगड पोलीस ठाणे) आणि कृषी अधिकारी (पंचायत समिती देवगड) यांच्या उपस्थितीत पंचनामा करून शेतमांगर वजा इमारतीचे मुख्य दरवाजा कुलूप लावून त्यावर सही शिक्क्यानिशी सील करून हा साठा जप्त केला. कारवाई अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 मधील कायद्यांनुसार करण्यात आली आहे. याप्रकरणी, संबंधित अनधिकृत खत विक्रेत्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे खतांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यास मदत होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ कृषी विभागाला कळवावे.