। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठी दूर्घटना घडली आहे, डोडामधून जात असलेला सैन्यदलाचं वाहन तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळलं, या घटनेत दहा जवान शहीद झाले आहेत. तर दहा जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्य दलाचा हा ट्रक डोडाच्या भद्रवाह चंबा रोडवरून जात होता, याचदरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
एका अधिकाऱ्यानं घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार अज्ञात कारणामुळे हा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर या अपघातामध्ये जे सैनिक जखमी झाले आहेत, त्यांना अपघात स्थळावरून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. भारतीय सैन्य दलाचं हे वाहन सैनिकांना एका उंच जागेवर पोस्टिंगसाठी घेऊन निघालं होतं, त्याचदरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन दोनशे फूट दरीत कोसळलं.






