। रसायनी । प्रतिनिधी ।
पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील चावंढोली गावात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस किराणा दुकान फोडल्याची घटना घडली. चांवढोळी येथील श्रीराम किराणा सुपर मार्केटच्या छतावरील सिमेंटचा पत्रा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 31 हजार 700 रुपयांचा माल चोरून नेण्यात आला.
सकाळी दुकान उघडण्यास आल्यावर दुकान मालक रमेशकुमार सिर्वही याने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी रसायनी पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत सीसीटीव्हीच्या माध्यमातून अखिलेशकुमार परदेशी राम (24) व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेतले व अटक केली आहे. त्यांच्याकडून दुकानात असणारा 31 हजार 700 रूपयाचा माल ताब्यात घेतला आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शशांक पिंगळे अधिक तपास करीत आहेत.






