संरक्षण भिंतींचा अभाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
जांभुळपाडा ते माणखोरे, फल्याण, वावे या मार्गावर करचुडे गावाच्या पुढे असलेल्या छोट्या पुलावर (साकव) पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.22) रात्री मोटारसायकल पुलावरून घसरली. यावेळी मोटारसायकलवरील चालक आणि मागे बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खोपोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या पुलावर गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे पुलाला संरक्षण भिंत किंवा कठडे नसणे होय. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तोंडी, लेखी अर्ज व निवेदने दिली आहेत. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या मार्गाचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंतींचा समावेश करण्यात आलेला नाही. या अपघाताची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात बांबूची लाकडी अडथळे व पट्ट्या लावून इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे उपाय अपुरे असून, मोठ्या दुर्घटनेची शक्यता कायम आहे.
या अपघातानंतर संपूर्ण सुधागड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. ‘प्रशासन अजून मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते आहे का?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन उचलण्यात आला नाही. त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या पुलावर तातडीने संरक्षण भिंत व कठडे उभारावेत, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.






