| हमरापूर | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे वडखळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय जांभळे व पेण पंचायत समिती गणाचे उमेदवार ललिता म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडखळ येथील धायरेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.
या प्रसंगी बोलताना संजय जांभळे म्हणाले की, आजची हि गर्दी शेकापच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी जमली आहे. अकार्यक्षम विरोकांना सागरवाडीच्या ग्रामस्थांनी हकलवुन लावले, आता जनता जागृक झाली आहे. मागील 5 वर्षांत जनतेच्या समस्या न सोडवणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार घरी बसवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, वाशी खारेपाटातील जनसामान्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप हे सत्ताधाऱ्यांचे आहे. आमदार रवींद्र पाटील, खासदार धैर्यशील पाटील हे दोन्ही लोकप्रतिनिधी वाशी पाणी प्रश्नी जनतेची दिशाभूल करीत आहेत. आदानी-अंबानी सारख्या उद्योगपतींच्या घशात येथील सुपीक जमिनी घालण्याकरिता पाणी न देण्याचे षडयंत्र सत्ताधारी करीत असल्याचा आरोप देखील संजय जांभळे यांनी यावेळी केला.
तर, शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी, येत्या 7 तारखेला जिल्हा परीषद निवडणूकीत जांभळे व पंचायत समितीचे उमेदवार ललिता म्हात्र हे बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्री पेणला तिसरी मुंबई करण्याची घोषणा दावोसमध्ये करतात; परंतु, येथील स्थानिकांना त्याचा किती फायदा होईल, हा संशोधनाचा विषय आहे. जवळच असलेल्या जे.एस.डब्लू. कंपनीत आजही स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होत नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरिता रोजगार मेळावे घेतो व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो, असेही त्यांनी सांगितले.







