। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील मुंब्रा–पनवेल महामार्गावरील रोडपाली बौद्धवाडा जवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रोडपाली बौद्धवाडा जवळून नावडा फाट्याकडे मोटारसायकलवरून जात असताना एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. विशेष म्हणजे, याच रोडपाली परिसरात अवघ्या दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा महामार्गाचा भाग अत्यंत अपघातप्रवण ठरत असून, येथे तातडीने गतिरोधक, सूचना फलक आणि वेग नियंत्रणाची व्यवस्था करण्याची गरज आहे. या संदर्भात समाजसेवक सुभाष गायकवाड यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा सुभाष गायकवाड यांनी दिला आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.






