| उरण | प्रतिनिधी ।
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनी शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणाऱ्या लेनवर एका ट्रेलरच्या खाली चिरडून मजुराचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव बृजभान मुन्डा यादव (32) असून, तो मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भीतरी येथील निवासी होता. तो उरण येथे ट्रेलर चालक म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजभान यादव याने रविवारी (दि.1) रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील ट्रेलर हा धुतुम येथील IOTL शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणाऱ्या लेनवर उतारावर थांबवला होता. त्याने ट्रेलरचा हँन्डब्रेक न लावता ट्रेलरमधून खाली उतरून ट्रेलरच्या समोर गेला असता, ट्रेलर उतारावर असल्याने आणि त्यावर भरलेला कंटेनर असल्याने वजनामुळे ट्रेलर पुढे गेला आणि बृजभान यादव याच्या अंगावरून जाऊन तो गंभीर जखमी झाला. बृजभान यादव यांना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले असता त्याना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.





