6, 7 आणि 9 फेब्रुवारीला मद्यविक्री बंद
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्यात आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रायगड जिल्ह्यात संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये सलग तीन दिवस ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी करत 6 फेब्रुवारी (मतदानाच्या आदल्या दिवशी), 7 फेब्रुवारी (मतदानाचा दिवस) आणि 9 फेब्रुवारी (मतमोजणीचा दिवस) या दिवशी मद्यविक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 6 व 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील, तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईपर्यंत विक्री बंद राहणार आहे.
7 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी मतदान होणार असून, 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियम, 1949 च्या कलम 142 (1) तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 135 (सी) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश देण्यात आला आहे. या आदेशानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रांतील तसेच मतमोजणी केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री आणि माडी विक्री अनुज्ञप्त्या (एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, टिडी-1 आदी) या तीन दिवसांसाठी बंद राहतील. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 54 व 56 नुसार परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.






