| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली को.ए.सो.सी.एच. केळुस्कर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी (दि.2) विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या ॲड.मनीषा नागावकर यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्यासोबतच मोटार अपघात कायदा व त्याअंतर्गत मिळणाऱ्या कायदेशीर हक्कांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर ॲड. उषा पाटील यांनी नालसाच्या डी.ओ.एन. व जागृती योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबागच्या सचिव तेजस्विनी निराळे, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा तथा नगरसेविका साक्षी पाटील या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध कायदे, योजना व कायदेशीर हक्क यांची उपयुक्त माहिती मिळाली असून विधी साक्षरतेस चालना मिळाली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट निलोफर शेख यांनी केले.






