| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात संकष्टी चतुर्थी निमित्ताने गुरुवारी (दि.5) गणेशभक्तांनी प्राचीन श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी श्री महागणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी आवर्जून हजेरी लावून, मनोभावे दर्शन घेतले. चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची निर्मिती पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत झाली. चिरनेर येथील गणपती मंदिर हे हेमाडपंथीय धाटणीचे दिसून येते. हे गणपती देवस्थान अत्यंत जागृत आहे. या ठिकाणी आलेल्या भक्तांची दुःखे निश्चित दूर होतात, अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे. श्रींच्या देवस्थानामुळे चिरनेर परिसरातील नागरिकांना दर महिन्याला चांगला रोजगार मिळाला असल्याची, माहिती देवस्थानचे माजी विश्वस्त संतोष ठाकूर यांनी सांगितले.







