। पुणे । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून तात्काळ पुण्याच्या दिशेने हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत होते. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पवारांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पवार यांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने सकाळपासूनच गोविंदबागेत त्यांची तपासणी केली. सुमारे तासभर वैद्यकीय पाहणीनंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल या खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मागील काही महिन्यांत त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ते पुन्हा जनतेच्या संपर्कात आले. गेल्या आठवड्यात सलग काही दिवस त्यांनी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि राज्यभरातून येणाऱ्या नेते–कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सततच्या भेटीगाठी आणि दगदगीमुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवू लागल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पवार यांना मास्क लावून वेगळ्या वाहनातून पुण्याकडे हलवण्यात आलं असून, तिथे तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत.







