वेगवेगळ्या शासकीय योजना एका छताखाली; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सर्वसामान्य घटकाला एका छताखाली योजनांच्या लाभांसह त्यांना सर्व योजनांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. कुरुळ येथील आरसीएफ हॉलमध्ये शनिवारी (दि.14) हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सचिव तथा न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या महामेळाव्याचा उद्घाटन सोहळा सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित असणार आहेत. या मेळाव्यामध्ये कायदेविषयक तसेच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन, महसूल, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, कृषी, मत्स्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व विभागाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी 31 हून अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहेत. वंचित घटकाचा सर्वांगिण विकास साधण्याबरोबरच शासनाच्या सर्व योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाचा या मेळाव्यामध्ये सहभाग असणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून कायदेविषयक सेवांसह वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी केल्याची माहिती तेजस्विनी निराळे यांनी दिली.
वंचित, दुर्बल गरजूंना मिळणार योजनांचा लाभ
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा महामेळावा आयोजित केला आहे. कायदेविषयक माहिती व शासकीय योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. वंचित, दुर्बल, गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात निवडणक लाभार्थ्यांना योजनांचा लाभही तात्काळ देण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी दिली.






