| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लावण्याचा तगादा सुरु केला. त्यानंतर अवास्तव विज बिल येऊ लागले. अचानक वीज बिलामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला. तकारी वाढू लागल्या. शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या ही बाब लक्षात आली. अखेर सर्वसामान्यांच्या हितासाठी शेकापच्यावतीने अलिबागमध्ये स्मार्ट मीटरविरोधात लढा सुरू करण्यात आला. स्मार्ट मीटरची वात अलिबागमधून पेटली. स्मार्ट मीटरच्या नावाखाली पाय रोवणाऱ्या राक्षसाला रोखण्यासाठी आंदोलन सुरू केले. अदानीसारख्या धनदांडग्यांच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर आणून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भांडवलदारांच्या मदतीने सर्व गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या जनतेने ज्यांना निवडून दिले, ते लोकप्रतिनिधी सत्तेत लोळून घेत आहेत. सत्तेचा माज दाखवून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. गुजरातसह दक्षिण भारतात स्मार्ट मीटरला विरोध दर्शविण्यात आला. मग महाराष्ट्रात घरोघरी स्मार्ट मीटर बसवून सरकार आर्थिक पिळवणूक का करीत आहे? स्मार्ट मीटरवर नियंत्रण अदानीचे नियंत्रण आहे. खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. भांडवलदारांची मंडळी येऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत. सरकारने हे वेळीच रोखणे गरजेचे आहे. अन्यथा शेकाप नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन आगामी काळात केले जाईल, असा इशारा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला.
स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त : सुरेश घरत
स्मार्ट मीटर हा सर्वात घातकी आणि सर्वसामान्यांशी निगडीत विषय आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनतादेखील या स्मार्ट विरोधात आक्रमक झाली आहे. अलिबागपासून सुरु झालेला हा लढा आता जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर पोहचू लागला आहे. आगामी काळात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने स्मार्ट मीटर विरोधात मोठा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात अलिबागमधून 25 हजार कार्यकर्ते सहभागी हणार आहेत, असा विश्वास शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात अलिबागसह रायगड जिल्ह्यातून कार्यकर्त्यांन मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन केले.






