खेळाडूंच्या कामगिरीने मैदान दणाणले
| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने व अमर हिंद मंडळातर्फे कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा दादरमधील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत रंगल्या असून मुंबईतील खो-खो प्रेमींसाठी हे मैदान आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यावेळी खेळाडूंनी वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि जिद्दीचे अप्रतिम दर्शन घडवले आहे. महिला आणि पुरुष गटातील साखळी सामन्यांत पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बँक ऑफ इंडिया यांनी दमदार विजय नोंदवत विजेतेपदासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.
महिला गटातील साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर 22-13 असा 540ः मिनिट राखून 9 गुणांनी विजय मिळवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या कल्याणी कंक, अर्चना माजी, निसार के एम, सुहानी धोत्रे यांनी दमदार खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या पायल पवार, श्रेया सनगरे, अंजली कनोजिया, दिक्षा सोनसुतकर यांनी चांगली झुंज दिली; मात्र, विजयापासून दूर राहिल्या. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.
महिला गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने महावितरण कंपनीचा 25-02 असा 1 डाव व 23 गुणांनी एकतर्फी पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. विजयी पश्चिम रेल्वेच्या अर्चना माजी, किशोरी मोकाशी, कल्याणी कंक, शिवानी धोत्रे, संध्या सुरवासे यांनी सलग प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. पराभूत महावितरण कंपनीच्या मनाली काजारे, मिना कांबळे, देविका अहिरे यांनी प्रयत्न केले; मात्र, पश्चिम रेल्वेच्या भक्कम आक्रमणासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या सामन्यावर संदीप केदार यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.
पुरुष गटातील सामन्यात रचना नोटरी वर्कसने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले; मात्र, बँक ऑफ इंडियाने 25-23 असा 2 गुणांनी थरारक विजय मिळवला. विजयी बँक ऑफ इंडियाच्या जर्नादन सावंत, विजय देठे, सुजल जायगडे, राज सकपाळ यांनी सलग प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. पराभूत रचना नोटरी वकर्सच्या प्रथमेश दुर्गावळे, ओमकार मिरगळ, रुपेश कोंढाळकर, भावेश बने यांनी जोरदार लढा दिला. या सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर 28-26 असा 2 गुणांनी विजय मिळवला. विजयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्जुन अनिवासे, संचित कंक, पियुश घोलम, अजय मित्र, सुरज खाके यांनी सलग उत्कृष्ट खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या आकाश हजारे, अक्षय खापरे,, वेदांत देसाई, हनुमंत जगताप यांनी शेवटपर्यंत जोरदार प्रतिकार केला. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.
व्यावसायिक खो-खोचा नवा अध्याय
कै. उमेश शेणॉय स्मृती चषक ‘डायनॅमिक' खो-खो स्पर्धेत प्रत्येक सामना अधिक चुरशीचा आणि रोमांचक होत असून, खेळाडूंच्या उत्कृष्ट कौशल्याने अजितदादा पवार क्रीडा नगरी अक्षरशः दणाणून गेली आहे. वेगवान खेळ, अचूक बचाव आणि आक्रमणाच्या जोरावर संघ विजेतेपदासाठी झुंज देत असून, ही स्पर्धा खो-खोच्या व्यावसायिक युगाचा नवा अध्याय लिहित आहे.







