जीवित-मालमत्तेची हानी नाही
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील कोप्रोली परिसरात रविवारी (दि. 15) सायंकाळी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. सायंकाळी सुमारे 5.47 वाजता बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.4 इतकी नोंदविण्यात आली असून, नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल-कोप्रोली परिसरात अचानक जमिनीला हलका कंप जाणवल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले. काही ठिकाणी घरातील भांडी, पंखे किंवा लटकती वस्तू हलताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. भूकंपाचा धक्का काही सेकंदच जाणवला, मात्र अनपेक्षित असल्याने परिसरात चर्चा सुरू झाली. कोप्रोली हे गाव औद्योगिक तसेच निवासी दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक महसूल व आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आली.
उरण तालुक्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. कोणतीही इमारत, रस्ता किंवा सार्वजनिक सुविधांना नुकसान झाल्याची नोंद नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने तो “सौम्य” स्वरूपाचा मानला जातो. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, हवामान व भूकंप निरीक्षण यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींबाबत प्रशासन सतर्क असल्याची माहिती देण्यात आली आहे.







