तालुक्यातील संख्या पोहचली 39 वर; 2021 मध्ये झालेल्या होत्या निवडणुका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाची मुदत संपली असून, तेथे आता प्रशासक राजवट आली आहे. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी प्रशासक राजवट आहे आणि आता आणखी नऊ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक आले असल्याने तालुक्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची संख्या 39 वर पोहचली आहे.
तालुक्यातील कोरोना काळात जानेवारी 2021 मध्ये निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्य मंडळाची पाच वर्षाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. जानेवारी 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या तालुक्यातील कोल्हारे, दामत, पोशीर, साळोखतर्फे वरेडी, कडाव, हुमगांव, वैजनाथ, भिवपुरी आणि जिते अशा नऊ ग्रामपंचायती यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस नऊ फेब्रुवारी रोजी होता. या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीचा निकाल असल्याने मुदत संपणारे बहुसंख्य ग्रामपंचायत कार्यालये शेवटच्या दिवशी ओस होते. या सर्व नऊ ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रशासक नेमण्यात आले आहेत.कर्जत तालुक्यात 55 ग्रामपंचायतीपैकी 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत 20 ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर 10 डिसेंबर 2024 पर्यंत तालुक्यातील आणखी 11 ग्रामपंचायती यांच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे.
तालुक्यातील 30 ग्रामपंचायती मध्ये2025 सुरु होण्याआधी सदस्य मंडळ अस्तित्वात नाही. सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत संपलेल्या 25 ग्रामपंचायत मध्ये शासनाने प्रशासक यांच्या हाती कारभार दिला आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे, मोग्रज, माणगावतर्फे वरेडी, सावेळे, वारे, किरवली, बोरिवली, शेलू, पाषाणे, मानिवली, हालिवली, आसल, खांडपे, शिरसे, ममदापुर, पळसदरी, सावळा, हेदवली, पिंपळोली, बीड बुद्रुक, अंजप, रजपे, जामरुंग, चिंचवली अशा 25 ग्रामपंचायत मध्ये 2024 पासून प्रशासक राजवट आहे तर वदप, वरईतर्फे नीड, तिवरे, वाकस, उमरोली असा सहा ग्रामपंचायतमध्ये देखील सदस्य मंडळ यांची मुदत संपल्याने 2025 पासून त्या ठिकाणी प्रशासक राजवट आहे. तर आता कोल्हारे, दामत, पोशीर, साळोखतर्फे वरेडी, कडाव, हुमगांव, वैजनाथ, भिवपुरी आणि जिते या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक राजवट आली आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
कशेळे, मोग्रज, माणगावतर्फे वरेडी, सावेळे, वारे, किरवली, बोरिवली, शेलू, पाषाणे, मानिवली, हालिवली, आसल, खांडपे, शिरसे, ममदापुर, पळसदरी, सावळा हेदवली, पिंपळोली, बीड बुद्रुक,अंजप, रजपे, जामरुंग, चिंचवली, वदप, वरईतर्फे नीड, तिवरे, वाकस, उमरोली, कोल्हारे, दामत, पोशीर, साळोखतर्फे वरेडी, कडाव, हुमगांव, वैजनाथ, भिवपुरी,जिते.







