महाशिवरात्रीनिमित्त ग्रामीण भागात भक्तीचा पूर; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
| श्रीवर्धन | संदेश घोलप |
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रायगड जिल्हा अक्षरशः शिवमय झाला. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यासह आगरवाडा, कोंडीवली, जावळे आणि हरिहरेश्वर, धारवली परिसरातील शिवमंदिरांत पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुद्राभिषेक, महाआरती, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. ‘हर हर महादेव’च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. खररसई-आगरवाडा ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून श्री सोमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण करून प्राणप्रतिष्ठापना सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला.
क्रीडा स्पर्धा व भव्य महाप्रसाद
मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. गावकरी व भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
आडी वरचीवाडी व कोंडीवलीत भक्तीची पर्वणी
आडी वरचीवाडी: स्वयंभू मंदिरात अभिषेक, पालखी मिरवणूक आणि महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. रात्रीच्या महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. कोंडीवलीत ओंकार ग्रामस्थ मंडळ व सरस्वती महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवपूजन, आरती व सत्कार समारंभ पार पडले. दैवत पाटील यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तीमय झाले.
विशेष आकर्षण
पहाटे अभिषेक व रुद्रपाठ, कळसपूजन व कलशारोहण सोहळा शेकडो भाविकांसाठी महाप्रसाद ग्रामस्थांच्या देणग्या व श्रमदानातून मंदिराचा कायापालट साध्य झाला असून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
प्रमुख देवस्थानांत भाविकांची मांदियाळी
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरी हरेश्वर येथे व धारवली येथील धारेश्वर तसेच श्रीवर्धन जीवन बंदर जिवनेश्वर मंदिर आणि देवखोल येथील परिसरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. दिवसभर रुद्राभिषेक, महाआरती व नामस्मरणाने परिसर भारून गेला होता.
सामाजिक एकात्मतेचा संदेश
महाशिवरात्रीच्या निमित्ताने केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर ग्रामस्थ, महिला मंडळे, युवक मंडळे आणि स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागातून सामाजिक एकात्मतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण भागात या निमित्ताने सांस्कृतिक नवचैतन्य निर्माण झाले असून परंपरा आणि श्रद्धेचा संगम अधिक दृढ झाला आहे. रायगड जिल्ह्यातील ही महाशिवरात्री भक्ती, उत्साह आणि सामाजिक ऐक्याची अविस्मरणीय पर्वणी ठरली. ‘हर हर महादेव’च्या अखंड जयघोषात श्रीवर्धन तालुका शिवमय झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.







