| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल स्वामी छाया येथे सोमवारी (दि.16) सायंकाळच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये हॉटेलमधील सामानाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच अलिबाग नगरपरिषदेचा अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. तसेच, हॉटेलमध्ये असणारे सामान आणि गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री उशिरापर्यंत आग कुठून लागली, याचा शोध घेऊन तेथे पाण्याचा मारा करण्यात येत होता. घटनास्थळी अलिबागमधील नागरिकांनी गर्दी केली होती. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांची यंत्रणादेखील पोहोचली होती. अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी देखील घटनास्थळी भेट देत हॉटेल मालकांची विचारपूस करून यंत्रणांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.






