50 कोटींचे सीमाशुल्क बुडविण्याचा प्रयत्न उघड
। उरण । प्रतिनिधी ।
जेएनपीए न्हावा -शेवा बंदरात केंद्रीय डीआरआय आणि मुंबई सीमा शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत इराणमधून आलेल्या 309 कंटेनरमधील सुका मेवा जप्त केला आहे. या आयातीतून सुमारे 50 कोटी रुपयांचे सीमाशुल्क बुडविण्याचा प्रयत्न झाल्याचा पर्दाफाश झाला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कोमोरोस देशाचा ध्वज असलेले ‘वीव रियफा’ हे मालवाहू जहाज इराणच्या बंदर अब्बास येथून 309 कंटेनर घेऊन जेएनपीए बंदरात दाखल झाले होते. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने जहाजाला दोन आठवडे रोखून धरत सखोल तपासणी केली. तपासात कंटेनरमधील सुका मेवा, विशेषतः आक्रोड, हा अफगाणिस्तानचा नसून अन्य देशातील असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आयात शुल्कात सवलत मिळवण्यासाठी तो अफगाणिस्तानचा असल्याचे खोटे कागदपत्र सादर करण्यात आल्याचे उघड झाले.
दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (एसएएफटीए) अंतर्गत अफगाणिस्तानातून येणाऱ्या मालावर शून्य आयात शुल्क लागू होते. याच तरतुदीचा गैरफायदा घेत बनावट ट्रान्झिट कागदपत्रे, बिल ऑफ लॅडिंग आणि ई-संचित प्रणालीवर खोटी माहिती अपलोड करून मालाची मूळ ओळख लपविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. बंदर अब्बास ते जिबेल अली (यूएई) या प्रवासाचेही बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले होते. या कारवाईनंतर सीमा शुल्क विभागाने संबंधित आयातदारांकडून मालाच्या किमतीएवढी बँक हमी मागितली आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात एका आयातदाराने मुबंई हाय कोर्ट येथे दाद मागितली आहे. सध्या जहाजातील कागदपत्रांची न्यायवैज्ञानिक तपासणी सुरू असून, पुढील चौकशीअंती अधिक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या तस्करीमुळे स्थानिक सुका मेवा व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून, रमजानपूर्वी मोठ्या प्रमाणावर बाजारात माल उतरवण्याचा डाव उधळण्यात आल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे.







