| मुंबई | पतिनिधी |
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंबादास दानवे यांनी केला. हा समृद्धी नव्हे तर लुटालुटीचा महामार्ग आहे, असे म्हणत त्यांनी सुमारे 1150 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला. या घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा थेट संबंध असल्याचे दानवे म्हणाले.
माजी आमदार अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे आरोप केले. दानवे यांनी विचारले आहे की, 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे 1971 मध्ये 23 एकर जमीन बक्षीस म्हणून कशी काय मिळू शकते? हा निव्वळ जादूचा प्रकार आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.जमिनीची अदलाबदल केवळ 3 एकर जमिनीच्या बदल्यात 23 एकरचा मोबदला लाटण्याचे कारस्थान रचल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे मृतांच्या नावावर कागदपत्रांची फेरफार करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
बड्या खासदाराच्या चालकाचा समावेश?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक दावा करताना दानवे म्हणाले, या महापापात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात आहे. हा चालक केवळ प्यादा आहे की यामागे एखादा मोठा वजीरफदडलाय? या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून संबंधित खासदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. हा सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडा असून या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. दोषींना तात्काळ तुरुंगात धाडले पाहिजे, असेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.







