अलिबागच्या मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण सुरू
| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटननगरी अलिबागला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता ठोस उपाययोजना सुरू झाल्या आहेत. पर्यटकांची वाढती गर्दी, वाहनांची संख्या आणि शहरातील अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणारी कोंडी फोडण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण हाती घेण्यात आले असून, या कामांमुळे अलिबागच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

शहरातील वाहतुकीचा सर्वाधिक ताण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सर्कल परिसराचे तसेच पुढे आर्यन डेव्हलपर्स परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या भागातील रस्त्याची रुंदी वाढल्याने वाहनांना मार्गक्रमण करण्ो अधिक सोयीचे होणार असून, वाहतुकीचा खोळंबा कमी होण्यास मदत मिळणार आहे. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या महत्त्वाच्या मार्गाच्या डांबरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. खड्डेमुक्त आणि सुस्थितीतील रस्त्यांमुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. तसेच रस्त्याची उंची वाढविण्यात येत असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवरही काही प्रमाणात उपाय होणार आहे.
अलिबागमध्ये प्रवेश करतानाच नागरिक आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावरही होतो. त्यामुळे रस्त्यांची केवळ डागडुजी न करता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांवर सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, जोग इन्फ्रास्ट्रक्चर परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव आहे. या ठिकाणी असलेले सर्कल हटविण्याबाबत पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.
अलिबागची ओळख पर्यटननगरी म्हणून अधिक भक्कम करण्यासाठी रस्ते, वाहतूक आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासोबतच अलिबागच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
अलिबागचा विकास हा केवळ रस्ते रुंदावण्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक अलिबागकराचा प्रवास सुकर व्हावा आणि पर्यटकांसाठी शहराचा अनुभव अधिक सुखद व्हावा, हा या कामांमागील मुख्य उद्देश आहे. अलिबागची पर्यटननगरी म्हणून ओळख अधिक समृद्ध करताना नागरिकांच्या सुविधांना नेहमीच प्राधान्य देणार आहोत.
– प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समिती सभापती, अलिबाग नगरपरिषद






