| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत आरोग्यविषयक जनजागृतीचा व्यापक संदेश देण्यासाठी श्रीवर्धन कुणबी समाजोन्नती संघातर्फे भव्य रक्तदान शिबीर व समाज जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि मानवतावादी दृष्टिकोन अधिक दृढ व्हावा, या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. कुणबी समाजाचे नेते ग.स. कातकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे चालविण्याच्या उद्देशाने रविवारी (दि.8) भव्य रक्तदान शिबिरावे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या शिबिरात महिलांच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्त्रीरोग, त्यावरील उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य तपासणी याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. मधुकर ढवळे उपस्थित राहून महिलांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.







