नेरळमध्ये 33 एसआरटी शेतकरी, 17 शेती शाळांचा सन्मान
| नेरळ | संतोष पेरणे |
देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर जमिनीशी नाळ जोडावी लागेल. जमीन आणि पाणी या मूलभूत संसाधनांकडे दुर्लक्ष करून केवळ मोठ्या घोषणा करून चालणार नाही. जमीन कमी होत आहे, पाण्याची टंचाई वाढत आहे, अशा परिस्थितीत जगातील तिसरी-चौथी महासत्ता बनण्याची स्वप्ने दाखवली जात असतील तर ती स्वप्नेच राहतील, असे परखड मत ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रमुख मयांक गांधी यांनी व्यक्त केले.
नेरळजवळील सगुणाबाग (ता. कर्जत, जि. रायगड) येथे स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांच्या जयंतीनिमित्त सगुणा रुरल फाउंडेशनतर्फे आयोजित एसआरटी (सगुणा राईस टेक्निक) शेतकरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील एसआरटी पद्धतीने शेती करणाऱ्या 33 शेतकऱ्यांचा तसेच राज्यातील 17 ठिकाणी शेती शाळा चालवणाऱ्या 17 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मयांक गांधी म्हणाले, जमीन आपल्याला जगाचा महासत्ता बनवू शकते. मात्र, त्या जमिनीवर काम करण्याची तयारी असली पाहिजे. पाण्याची कमतरता किती गंभीर आहे, याची जाणीव धोरणकर्त्यांना नसल्यास भविष्यात मोठे संकट उभे राहील. जमीन आणि पाणी हीच खरी आर्थिक स्रोत आहेत. त्यांची घट होत असताना केवळ घोषणांनी विकास साध्य होणार नाही.
ते पुढे म्हणाले, आम्ही पाच हजार गावांमध्ये काम करत असून सुमारे 30 हजार शेतकरी आमच्यासोबत जोडले गेले आहेत. काही गावांमध्ये वार्षिक उलाढाल 38 हजारांवरून 3 लाख 90 हजारांपर्यंत वाढली आहे. नीती आयोगानेही या उपक्रमाची दखल घेतली आहे. लहान शेतकऱ्यांना एकत्र करून समूहशेतीच्या माध्यमातून मोठे उद्दिष्ट समोर ठेवले, तर गावांचा आणि शेतकऱ्यांचा कायापालट होऊ शकतो. देशातील 23 ठिकाणी गावांना एकत्र करून अधिक नफ्याचे मॉडेल उभे केले आहे. परळी व पालघर परिसरात झालेले बदल पाहण्यासाठी या आणि अनुभव घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रमुख मयांक गांधी, कंट्रोल इंडिया युनियनच्या चिन्मयी देऊळगावकर, कृषी संचालक अंकुश माने, विभागीय सहसंचालक आमले, कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे, अनुराधा भडसावळे आदी उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याने शाश्वत शेती, समूहशेती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर भडसावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन दिपाली केळकर यांनी केले. आयोजनात अनुराधा भडसावळे, अनिल निवळकर, परशुराम आगिवले, संध्या देवस्थळे, शरद वागळे, प्रमोद शिंदे, निलेश मानकर यांचा सहभाग होता.
एसआरटी पुरस्कार प्राप्त शेतकरी
केशव गिराम (परभणी), परशुराम आगिवले (कर्जत, रायगड), गोपाल झगडे (रत्नागिरी), रामचंद्र पुंड (छत्रपती संभाजीनगर), दीपक जोशी (जालना), मीरा काळे (अहिल्यानगर), निलेश पानसरे (नाशिक), शंकर गायकवाड (नाशिक), डॉ. गणेश पोटे (जालना), प्रकाश खोब्रागडे (चंद्रपूर), दिनकर काळे (यवतमाळ), उमेश पोहदरे, अरुण तांडेल, रामचंद्र हाबळे (कर्जत, रायगड), डॉ. एस. डी. सोमवंशी (जालना), किशोर उत्तमचंद्र जैन (जालना), वामन कडाळी (बीड), शिवाजी बादाडे, विलास झुंजारराव (शहापूर, ठाणे), उषा देवरे (जळगाव), सुरेश नरवडे (संभाजीनगर), स्वप्नील महाजन (बुलढाणा), अभिनंदन सौंदते (कोल्हापूर), विद्याधर शिंदे (सातारा), राजाभाऊ देशमुख (वर्धा), पंकज देसले (नंदुरबार), महारू जाधव (नाशिक), किर्ती नगरे (नाशिक), दत्तात्रय जंगले (लातूर), गोविंद धूम (धरमपूर, गुजरात), भगवान रेड्डी (सैदापूर, तेलंगणा), वेंकटराव मलेला (हैदराबाद, तेलंगणा), नागेंद्र रेड्डी (आंध्र प्रदेश).
‘एसआरटी हे फळझाडांसह विविध पिकांमध्ये प्रभावी ठरत आहे. या तंत्रामुळे केवळ उत्पादन वाढत नाही, तर एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला सक्षम बनवतो. शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचत आहे. एआय आणि शेती यामध्ये स्पर्धा नसून हे तंत्रज्ञान शेतीसाठी पूरक ठरणार आहे.”
-अंकुश माने,
कृषी संचालक, महाराष्ट्र







