एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली असली तरी उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरणात सध्या केवळ 50 टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, सुमारे 40 हजार नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. मे महिन्यात तीव्र टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येते. रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत 1978-79 दरम्यान या धरणाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा आणि चौल या ग्रामपंचायत क्षेत्रांतील तब्बल 65 गावे व 33 वाड्यांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे धरणावरील ताण वाढत चालला आहे.
धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे 40 दशलक्ष घनफूट आहे. यापूर्वी 56.40 मीटरपर्यंत जलसाठा उपलब्ध होता. मात्र, सध्या पातळी झपाट्याने घसरत असून, केवळ अर्धा साठा उरला आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची घट अधिक वेगाने होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार संबंधित गावांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी, हजारो कुटुंबांना पाणी साठवून वापरण्याची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कपात लागू झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, गळती रोखणे आणि अनावश्यक वापर टाळणे आवश्यक असल्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या धरणात 50 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, तापमान वाढत असल्याने साठ्यात घट होण्याचा वेग वाढू शकतो. मे महिन्यात टंचाई तीव्र होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. ही तात्पुरती उपाययोजना असून, नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने आणि जपून वापर करणे अत्यावश्यक आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास उन्हाळा मोठ्या अडचणीशिवाय पार करता येईल.
साहिल आचरेकर,
कनिष्ठ अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग





