रेवदंडा किनारी मद्यपींचे अड्डे वाढले
अनधिकृत टपऱ्या हटवण्याची ग्रामस्थांची मागणी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा-हरेश्वर मार्गावरील समुद्रकिनाऱ्यालगत स्थानिक व पर्यटकांसाठी उभारलेले सुरू आणि माडाचे बन सध्या रात्री मद्यपींच्या अड्ड्यांत रूपांतरित झाले आहेत. उशिरापर्यंत सुरू असलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे येथे दारू-बिअरची मैफिल रंगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असू संबंधित टपर्या तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू व माड बनात दारू व बिअरचे सेवन, धुडगूस आणि आरडाओरडा सुरू असतो. सकाळी या परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच, चकण्यांचा कचरा आणि घाण साचलेली दिसते. बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांवरही बाटल्या व कचरा टाकलेला आढळतो. परिणामी, विरंगुळ्यासाठी येणाऱ्या स्थानिक, पर्यटक व पाहुण्यांचा हिरमोड होत आहे. महिलांसाठी तर या भागात रात्री वावर असुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात बाहेरील व्यक्तींनी टपरी व्यवसाय सुरू केला असून, सिगारेट, तंबाखू, गुटखा, थंडपेय आदींची विक्री रात्री उशिरापर्यंत केली जाते. टपर्या उघड्या असल्याने विविध ठिकाणांहून मद्यपी व धूम्रपान करणारे येथे जमा होतात आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. काही टपऱ्यांसाठी पक्के बांधकाम केल्याचेही दिसत असून, त्या अनधिकृत असल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्याला अनेकदा तक्रारी देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात; मात्र रात्री गस्त अपुरी असल्याने मद्यपींना मोकळे रान मिळत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. महावितरणकडून वीजपुरवठा दिला गेल्याने स्थानिकांवर अन्याय झाल्याचीही भावना व्यक्त केली जाते.
रेवदंडा ग्रामपंचायतीकडून या टपऱ्यांना कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ फिरत्या हातगाड्यांना व्यवसायाची मुभा असल्याचे सांगण्यात येते. तरीही पक्क्या पायावर उभारलेल्या टपऱ्या परवानगीशिवाय कशा सुरू आहेत, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. सुरू-माडाच्या बनातील बेकायदेशीर टपऱ्या तात्काळ हटवून परिसरातील मद्यपींचे अड्डे बंद करावेत व पर्यटकांसाठी सुरक्षित, स्वच्छ वातावरण निर्माण करावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.






