अकरा महिन्यांची प्रतीक्षा संपली
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तब्बल 11 महिन्यांपासून बंद असलेली आधार नोंदणी व अद्ययावत सेवा अखेर श्रीवर्धनमध्ये पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत तहसील प्रशासनाने पुढाकार घेत तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात सेवा कार्यान्वित केली. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आधार सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना नोंदणी, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक लिंकिंग, बायोमेट्रिक अपडेट आदी कामांसाठी बोर्ली पंचतन, म्हसळा, महाड, माणगाव या ठिकाणी 40 ते 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
प्रश्न अधोरेखित झाल्यानंतर तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन सेतू केंद्र समन्वयक, तांत्रिक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. बंद पडलेली बायोमेट्रिक यंत्रणा दुरुस्त करण्यात आली तसेच आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. सेवा सुरळीत चालावी यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आधार सेवा पुन्हा सुरू झाल्याने शिष्यवृत्ती अर्ज, वृद्धापकाळ पेन्शन प्रस्ताव, पीएम किसान योजना, बँक खाते लिंकिंग तसेच जात व उत्पन्न प्रमाणपत्रांसारखी अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली; मात्र आता सेवा सुरू झाल्याने समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त काऊंटर सुरू करावेत, तसेच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. 11 महिन्यांनंतर आधार सेवा पुन्हा सुरू झाल्याने श्रीवर्धनमध्ये प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले जात आहे. नागरिकांनीही सेवेचा लाभ घेण्यासाठी नियोजनपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







