सीईआयआरच्या मदतीने माणगाव पोलिसांची कारवाई
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव पोलीस ठाण्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व गहाळ झालेले एकूण पाच मोबाईल फोन हस्तगत करून संबंधित तक्रारदारांना परत दिले आहेत. अंदाजे एक लाख रुपयांच्या किमतीचे हे मोबाईल ‘सीईआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून शोधण्यात पोलिसांना यश आले.
अलीकडील काळात मोबाईल हरवणे, चोरी जाणे किंवा गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा घटनांमध्ये अनेक नागरिक आर्थिक नुकसानासोबतच वैयक्तिक माहितीच्या गैरवापराच्या भीतीनेही त्रस्त होतात. याच पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस ठाण्याने हरवलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींची दखल घेत तांत्रिक पद्धतीने शोधमोहीम राबवली. असून सायबर गुन्हे व सुरक्षेबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी केले आहे.
सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने संबंधित मोबाईलचे आयएमईआय क्रमांक ट्रॅक करून त्यांचा मागोवा घेण्यात आला. सखोल तपासानंतर पाचही मोबाईल हस्तगत करण्यात आले. 2 मार्च रोजी सोमवारी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रारदारांना बोलावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत माणगाव पोलिसांचे आभार मानले. यावेळी माणगाव पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच सीईआयआर पोर्टलवर नोंदणी करून संबंधित मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवर्जून सांगण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये अधिकच विश्वास निर्माण झाला असून, तांत्रिक साधनांचा योग्य वापर केल्यास गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
पोलिसांकडून आवाहन
अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसला प्रतिसाद देऊ नये, ओटीपी अथवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सजगता आणि तत्परता अत्यावश्यक असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.







