| पनवेल | प्रतिनिधी |
सायन-पनवेल महामार्गावर कामोठे येथील के. एल. कॉलेज समोर असलेल्या बस स्टॉपच्या मागे सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. मात्र, हे शौचालय प्रवासी वर्गाला त्रासदायक ठरत आहे. या शौचालयातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून, बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना नाक मुठीत धरून उभे राहावे लागत आहे. तसेच, बस स्टॉपलगत असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या छोट्या केबिनमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गालाही या अस्वच्छतेचा फटका बसत आहे. त्यातच वरच्या पाण्याच्या टाकीत दोन ते तीन दिवस पाणी नसल्याने स्वच्छतेची समस्या अधिक गंभीर बनली आहे. प्रवासी व स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





