| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बामणगावमधील ग्रामपंचायतीच्या आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन शनिवारी (दि.7) करण्यात आले. उन्नती हॉस्पिटल आणि आयसीयू पनवेल, विक्रांत वार्डे यांचे विवा फाऊंडेशन आणि प्रतिक खारकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत योजनेचे ई कार्ड नोंदणी, सर्व प्रकारच्या आजार व विकारांची प्राथमिक स्वरुपाची तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब आदी तपासणी या शिबीराच्या माध्यमातून करण्यात आली. बामणगावमध्ये हे शिबीर भरविण्यात आले. या शिबीरात 75हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यातील दहा रुग्णांच्या मुतखड्याची शस्त्रक्रीया मोफत केली जाणार आहे. या शिबीरात उन्नती हॉस्पिटल आणि आयसीयू पनवेलचे डॉ. समाधान पाटील, श्रीकांत किल्लेकर, प्रतिक पानकर, प्रणिता भोईर, शितल म्हात्रे, व्यास वराड, समरेश शेळके, सागर नागांवकर, तेजेस पाटील, ऋषी थळे, अनिकेत ठाकूर, प्रतिक खारकर आदींचे योगदान मोलाचे राहिले आहे.







