| पनवेल | प्रतिनिधी |
नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. असे असताना आज पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांची निवड करण्यात आली.
खरं पाहता पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेता यांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत सत्ताधाऱ्यांनी आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ही निवड अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. याबाबत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली त्यावेळेस आयुक्तानी सांगितलं की विरोधी पक्षनेता हा संपूर्ण महापौरांचा अधिकार आहे. यानंतर या शिष्टमंडळाने महापौर नितीन पाटील यांची भेट घेतली असता त्यांनीही त्यावेळेस ठोस असं उत्तर दिलं नाही. यानंतर याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे अरविंद म्हात्रे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याची सुनावणी मंगळवार दिनांक 17 रोजी होणार होती. मात्र, आजच महापौरांनी याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे गटनेते केतन भगत यांना फोन करून सांगितले की आपल्याला विरोधी पक्षनेतेपद दिले आहे आणि त्याच वेळेस त्याने अरविंद म्हात्रे यांना सुद्धा फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर आज दुपारी तीन वाजता अरविंद म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा कार्यभार स्वीकारला. ज्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस या महाविकास आघाडीचे संपूर्ण 13 नगरसेवक उपस्थित होते.







